CAREER GUIDANCE


For Career Guidance call Shri. Abhijit Patil Mob No 8605235011



बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनो ‘काय मग? आता पुढे काय?’

‘कुठे प्रवेश घेणार?’ अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आजकाल तर मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्याची अधिक चिंता असते, पण माहिती असतेच असे नाही. काळाबरोबर वाढत जाणाऱ्या संधी आणि पर्यायाने वाढणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती असणे तसे अवघडच आहे. बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला असे तीन पर्याय आहेत. त्यापैकी कलाशाखेबद्दलची माहिती जाणून घेऊयात. समाजाला केवळ डॉक्टर, अभियंत्यांचीच नव्हे तर समाजशास्त्रज्ञांसह इतर मानव्यशास्त्राशी संबंधित व्यावसायिकांचीही मोठी गरज असते. याला अनुसरून अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक कला शाखेची निवड करत आहेत, त्यांचे स्वागत करायला हवे.
कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे प्रमुख कारण म्हणजे कला शाखेतील विषयांद्वारे नवनव्या क्षेत्रांमध्ये खुल्या होणाऱ्या संधी हे आहे. अभियांत्रिकी, वैद्यक यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक ठरणाऱ्या टक्केवारीची वाढलेली चुरस, अभियांत्रिकी आणि वैद्यक अभ्यासक्रमाचा वाढलेला आवाका आणि यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये वाढणारा ताणतणाव टाळून नवनव्या करिअरच्या वाटांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी कला शाखेकडे वळू लागले आहेत. 
खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा करियर मार्गदर्शनपर लेख लिहिण्यात येत आहे, तसेच विद्यार्थ्यांना माझ्या इंग्रजी विषयाच्या ब्लॉगद्वारे मार्गदर्शन करण्यात येते  - 
ENGLISH FOR JUNIOR COLLEGE 
https://englishforjrstudents.blogspot.com

 विद्यार्थी मित्रानो, आयुष्यात अकरावी व बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. ही दोन वर्षे आपल्या करिअरला कलाटणी देणारे असतात. पण विद्यार्थ्यांना त्यांची आवड, इच्छा, पालकांची इच्छा, उपलब्ध संधी प्राप्त गुण अशा विविध बाबींचा विचार करावा लागतो. या गोष्टींचा विचार करून करिअरचे क्षेत्र निवडल्यास त्यात नक्कीच यश मिळते. लहान वयापासून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या आवडीनिवडी असतात. अभ्यासाबरोबरच आपली आवड जपताना त्यांना मनसोक्त आनंद मिळतो. चित्रकारी, छायाचित्रण, वाचन, लेखन, आकडेमोड, तांत्रिक जोडणी, संवाद साधणे, आकाश निरीक्षण, एखादा खेळ अशा विविध गोष्टींमध्ये अनेकांचे मन रमते. काहींना यातच आपले करिअर करण्याची इच्छा असते. तर काही जण यापासून वेगळे करिअर निवडून आपली आवड जपत असतात. आपल्या आवडीनुसार उपलब्ध संधींचा विचार करून करिअरची निवड करणे महत्त्वाचे आहे.

पालकांची भूमिका : मुलांच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक पालक मुलगा किंवा मुलगी शाळेत जायला लागल्यानंतर लगेच त्यांच्या करिअरचा निर्णय घेतात. त्यानुसार शाळा, माध्यम, विषयांची निवड केली जाते. अकरावी व बारावीनंतर त्यानुसार शाखा निवड केली जाते. पण, अशा विद्यार्थ्यांना त्यांची आवड किंवा क्षमतेची जाणीव असूनही पालकांच्या इच्छेनुसार करिअर निवडावे लागते. अशा वेळी अनेकदा ते त्यात अयशस्वीही ठरू शकतात. तर, काही पालक आपल्या मुलांच्या क्षमतेनुसार त्यांच्या आवडीला प्राधान्य देतात. करिअरची निवड करताना अशा सर्वच बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे.

कला शाखेतील करिअरच्या संधी 
सध्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्राची गरज आणि उपलब्ध मनुष्यबळानुसार रोजगार मिळतात. काही नवीन क्षेत्रही उदयास आली आहेत. त्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्याची माहितीही सहजपणे उपलब्ध होते. सर्व बाबींची माहिती घेऊनच करिअरची संधी साधणे महत्वाचे आहे. या शाखेमध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र यासारख्या विषयांमध्ये उत्तम करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. मानसशास्त्रासारख्या विषयात अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन करता येतात. त्यात सोशल सायकॉलॉजी, स्कूल सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी, कंझ्युमर सायकॉलॉजी, काउन्सिलिंग इत्यादी विषयांचा समावेश होतो. याशिवाय या शाखेतून इतिहास. भूगोल, गणित, संख्याशास्त्र आणि इंग्रजी, मराठी, संस्कृतसह जर्मन, फ्रेंच, जॅपनीज सारख्या परकीय भाषांमध्ये सुद्धा अध्ययन व करिअर करण्याची सोय आहे. कला शाखेतून बारावीनंतर बीबीए,  लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बीएफ, डिझायनिंग, पत्रकारिता यांसारख्या क्षेत्रात जाता येते तर पदवीनंतर स्पर्धा परीक्षा, एमबीए, बँकिंग, इन्शुरन्स, आर्मी, पत्रकारिता, लॉ, एमएसडब्लू, मीडिया, ट्रॅव्हल/ टुरिझम, रेल्वे, लायब्ररी सायन्स, राजकारण अशा विविध क्षेत्रांत पुढील शिक्षणाच्या / करिअरच्या संधी उपलब्ध होतात. यूपीएससी/ एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखा आदर्श शाखा आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षांची तयारी पदवीपर्यंत शिक्षण घेताना करणे सहज शक्य होते. 

विधी क्षेत्रातील करिअर : 
बारावीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना लॉ पदवी कोर्स करता येऊ शकतो. याकरिता एक सीईटी येते. त्यासाठी लीगल अॅप्टिट्यूड, लॉजिक रीयनिंग, सामान्यज्ञान, अंकगणित व इंग्रजी या विषयांवर आधारित प्रश्न असतील. यावरील गणांच्या आधारे महाराष्ट्रातील सर्व विधी महाविदयालयांची एकत्रित प्रवेशप्रक्रिया सुरू होते.

अभियांत्रिकीतील करिअर
अभियांत्रिकीमध्ये पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करता येतो. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवीला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. तसेच बारावी नंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. पदवी प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (DTE) सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते. त्याची माहिती डीटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी आयआयटी-जेईई ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच, एआय ट्रिपल ई ही परीक्षा देशपातळीवरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. या परीक्षेद्वारे देशातील कोणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार या क्षेत्रांत संधी आहेत. ही तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था यामध्ये करिअरसह नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा देता येतात. तसेच एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस हे उच्च शिक्षण घेता येते. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअर, कॉम्प्युटर इंजिनिअर, ऑटोमोबाईल, टेलिकम्युनिकेशन, एरोनॉटिकल इंजिनिअर, अॅग्रिकल्चरल इंजिनिअर, मरीन इंजिनिअर, हायवे इंजिनिअर, टाऊन अॅण्ड कंट्री प्लॅनिंग यांसह ४० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

वैद्यकीय क्षेत्र
येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (NEET) गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षीचे सर्व आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट'ला सामोरे जावे लागणार आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ, हे आरोग्यविज्ञान अभ्यासक्रम व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्व शासकीय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 'नीट' परीक्षेतील गुणवत्तेनुसार राबविली जाणार आहे.

पॅरामेडिकल : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पॅरामेडिकल अभ्यासक्रम चालविला जातो. यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन, रेडिओग्राफीक टेक्निशियन, रेडिओथेरपी टेक्निशियन, कार्डिओलॉजी टेक्निशियन, न्यूरॉलॉजी टेक्निशियन, ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशियन, आप्टोमेट्री टेक्निशियन, प्लॅस्टर टेक्निशियन, अॅनास्थेशिया टेक्निशियन, आपरेशन थिएटर टेक्निशियन, ट्रान्सफ्युजन मेडिसीन टेक्निशियन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, एन्डोस्कोपी टेक्निशियन कम्युनिटी मेडिसीन/इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, फोरेन्सिक सायन्स अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो.

पशुवैद्यक शाखा: पशुवैद्यकशास्त्रातील पदवीधरांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या खूप संधी आहेत. बारावीनंतर पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम चालविणाऱ्या अनेक शासकीय आणि खासगी संस्था राष्ट्रीय व राज्य स्तरावर आहेत. पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.

बायोटेक्नॉलॉजी : यामध्ये जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, मायक्रोबायलॉजी, इम्युनॉलॉजी, व्हायरॉलॉजी असे अनेक विषय येतात. वैद्यकीय शास्त्राबरोबरच कृषिक्षेत्रातही याचा वापर अधिक होऊ लागला आहे. तसेच, इतर क्षेत्रांमध्येही बायोटेक्नॉलॉजीचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची मागणीही वाढली आहे.

औषधनिर्माणशास्त्र : बारावीनंतर फार्मसीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. डी. फार्मसी हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येऊ शकते. त्यानंतर बी. फार्म. ही पदवी घेता येईल. तर एम.फार्म. केल्यानंतर विविध फार्मसी विद्यालयांमध्ये लेक्चरर म्हणून करिअर सुरू करता येते. बी. फार्म. आणि डी. फार्म. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य सरकारकडून समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आर्किटेक्चर : बारावीची परीक्षा गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शाखेत प्रवेश मिळू शकतो. आर्किटेक्चरची पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय, सरकार, निमसरकारी नोकरी याबरोबरच इंटिरिअर डिझाईन, लँडस्केप डिझाईन, टाऊन प्लॅनिंग, साईट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, व्हॅल्युएशन अशा विविध क्षेत्रांत संधी आहेत.

कृषिक्षेत्रातील करिअर : महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रम घेतले जातात. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रक्रिया राबविली जाते. बारावी (शास्त्र) तील गुणांच्या आधारे हे प्रवेश दिले जातात. बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे विषय असलेल्या विद्यार्थ्यांना संधी आहे. पदवीमध्ये अॅग्रिकल्चर, फिशरीज, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फूड सायन्स, होम सायन्स असे विविध आहेत. मालेगाव व नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कृषी महाविद्यालयात विविध संधी उपलब्ध आहेत. 

फॅशन डिझायनिंग : फॅशन डिझायनिंग आणि फॅशन टेक्नॉलॉजी यामध्ये बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविले जातात. या क्षेत्रात सध्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

संरक्षण दलातील करिअर : देशातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संरक्षण दलात प्रवेश करता येतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए एक आणि एनडीए दोन, अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. हवाईदल व नौदल शाखेसाठी बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण किंवा सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरतात. साडेसोळा ते १९ वर्षादरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

लघु उद्योगक्षेत्रातील करिअर
बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, हे निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी आहे. तसेच त्वरित उद्योगक्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्रालयाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अल्प मुदतीचे विविध कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकासाबरोबच तांत्रिक उपकरणे हाताळता येणार आहेत. केंद्र शासनाकडून कौशल्यविकास योजना राबविल्या जात आहेत. आधार कार्ड असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कौशल्यविकास अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध आहे. बारावीनंतर नोकरी करून पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो. कौशल्य अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हार्डवेअर नेटवर्किंगचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच, बायोमट्रिक
मशीनमधील माहिती भरणे, संकलित झालेली माहिती काढणे तसेच मशीनच्या दुरुस्तीबाबत प्रशिक्षण दिले जाते. मोबाईल रिपेअरिंगबरोबरच, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध आहे. मुलींना संगणकाचे बेसिक ज्ञान दिले जाते. त्यात वर्ल्ड, एक्सल, पावर पॉइंट, इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबतचे मार्गदर्शन या केंद्रात उपलब्ध आहे.

फाईन आर्ट्स : ज्या विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग उत्तम आहे, अशा आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांपैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चार वर्षांचा फाईन आर्ट्स हा कोर्स करता येतो. या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याचे कला संचालनालय एक स्वतंत्र सीईटी परीक्षा मे महिन्यात घेते. ज्यामध्ये ड्रॉइंगचे चार पेपर असतात. 

बीसीए (बीबीए कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) : आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल अशा कोणत्याही शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा ३ वर्षांचा कोर्स आहे. अनेक संस्थांमध्ये हा कोर्स चालवला जातो. यासाठीची प्रवेश परीक्षा प्रत्येक संस्था स्वतंत्र घेते. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना रिक्रूटमेंटचे रेकॉर्ड पहाणे फायद्याचे ठरते. 

बीबीए : आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशन या कोणत्याही शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना बीबीए या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. अनेक संस्थांमध्ये हा कोर्स चालवला जातो. यासाठी प्रवेश परीक्षा प्रत्येक संस्था स्वतंत्र घेते. मात्र, BBA नंतर MBA केले तरच करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित विविध महाविद्यालयांमध्ये संधी उपलब्ध आहेत.

मनोरंजन क्षेत्रातील करिअर
संगीत, गायन, नृत्य, नाटक या कलाक्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मनोरंजन क्षेत्रात काम करणारे विविध कलावंत तयार व्हावेत, हा उद्देश समोर ठेवून आवश्यक अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना विविध खासगी संस्थांमधून या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. विद्यापीठाशी संलग्न मालेगाव येथील हिरे महाविद्यालयात आणि काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट 
बारावीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी आहेत. याकरिता सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गणित, रीझनिंग अॅबिलिटी, सामान्यज्ञान, इंग्रजी व अॅप्टिट्यूड फॉर सर्व्हिस सेक्टर या विषयांवर प्रश्न विचारले जातील. याशिवाय, महाराष्ट्रातील हॉटेल मॅनेजमेंट हा ३ वर्षांचा डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याची स्वतंत्र जाहिरात बारावी निकालानंतर प्रकाशित होईल. नाशिक (पंचवटी) येथील  नामांकित इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेकनोलॉजी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

मर्चंट नेव्ही: मर्चंट नेव्हीमध्ये जहाज नियंत्रण, कार्गो हँडलिंग अभियांत्रिकी देखभाल अशा विविध खात्यांमध्ये जहाजांवर अधिकारी म्हणून करिअर करता येते. अधिकारी होण्यासाठी बारावी (विज्ञान) नंतर तीन वर्षांचा नौशास्त्र विषयाचा पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आयआयटी जेईई परीक्षा देणे आवश्यक आहे. खासगी संस्थांमध्येही नेव्हल इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम आहेत. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित विविध महाविद्यालयात करियर मार्गदर्शन केंद्र आहेत, विद्यार्थ्यानी त्याचा लाभ घ्यावा.
✒️ प्रा. अभिजित पाटील 
         म. स. गा. कनिष्ठ महाविद्यालय 
          मालेगाव कॅम्प (नाशिक)

No comments:

सदिच्छा भेट- खाकुर्डी ता- मालेगाव (नाशिक)

Featured Post

Appreciation of the poem and Figure of speech - 2.2 The Sower

                                        Std- 11th English         2.2 The Sower - Victor Hugo  Appreciation of the poem and   Figure of spe...